♥ #Updates : ⏩ जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.⏩ १३ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार.⏩.⏩

उपेक्षित संशोधक दादाजी खोब्रागडे

    प्रफुल्ल फडके 

संशोधन हे फक्त विज्ञान क्षेत्रातच होते आणि रोजच्या जीवनाशी त्याचा काही संबंध नसतो असा विचार सामान्य माणूस करत असतो. विज्ञान आणि संशोधनापासून लांब पळतो किंवा त्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जाते. पण आपल्या नित्याच्या गरजेतूनही चांगले संशोधन होऊ शकते हे दाखवून दिले ते दादाजी खोब्रागडे यांनी.गरज ही शोधाची जननी आहे असे सहजपणे म्हटले जाते, पण हे वाक्य दादाजींनी खरे करून दाखवले. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे आपल्या देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. कृषी क्षेत्रातील दादाजी खोब्रागडे यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकून त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा शेतक-यांच्या समोर राहिला पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते.
                          दादाजीचे घर                   
दादाजींनी शोधलेल्या तांदळाच्या वाणांमुळे आपले सा-यांचे जगणे बदलले. तांदळाची चक्क नऊ वाणे त्यांनी विकसित केलेली आहेत. त्यांचे हे काम कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वाचे आहे. त्याची शासकीय पातळीवर म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही हे खेदाने का होईना कबूल करावे लागेल. कारण अखेरच्या काळात त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती, हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे या कल्पक संशोधक शेतक-याला आपण ख-या अर्थाने न्याय दिलेला नाही असेच म्हणावे लागेल. अगदी भारताचे राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांपासून ते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांपर्यंत सा-यांनीच त्यांचे कौतुक केले, पण नुसत्या कौतुकाने आणि मानसन्मानाने पोट भरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फोर्ब्स’ने २०१० मध्ये एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात दादाजींच्या संशोधनाची दखल घेत ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते, पण आपल्या संशोधनाचे मार्केटिंग त्यांना करता आले नाही. इथेच आमचा शेतकरी कमी पडला असे म्हणावे लागेल. एवढे संशोधन करूनही आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान देऊनही अखेरपर्यंत त्यांच्या दारिद्य्राचे दशावतार संपले नव्हते. हीच आपल्याला लांच्छनास्पद अशी गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या निधनांनंतर सरकारने त्यांच्या कुटुंबियांना भरघोस काहीतरी देऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड हे खेडे. दादाजींचे दोन खोल्यांचे घर, दीड एकर शेती आणि खाणारे सहा जीव असा प्रपंच. त्यामुळे प्रसंगी स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या या संशोधकाच्या आयुष्याच्या संध्याकाळी सर्वांचेच दुर्लक्ष झाले ही वैषम्याची बाबच म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर फोर्ब्सने दखल घेतल्यावर अनेकांनी त्यांचे कौतुक केले, हारतुरे घातले आणि त्यांची भेट घेतली. पण नंतर मात्र दादासाहेबांचा सर्वांना विसर पडला ही फार वाईट गोष्ट म्हणावी लागेल. खरे तर दादांमुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लाखो शेतक-यांचे जीवन पालटले आहे. त्यांचे संशोधन वापरून शेतकरी व व्यापारी श्रीमंत झाले. पण दादासाहेब मात्र जमिनीवरच राहिले. ही एकप्रकारची नियतीची विटंबनाच म्हणावी लागेल. दादासाहेबांनी तरीही आपले साधेपण आणि समाधान ढळू दिले नाही. 

आधुनिक काळातील संत तुकारामच म्हणावे लागेल त्यांना. आपली थैली भरणार का याचा विचार न करता इतरांना त्याचा लाभ मिळवून देणारे दादाजी तुकारामांप्रमाणेच अखेपर्यंत जैसे थे राहिले. आपल्या मनाची समजूत ते घालून घेत असत. आपल्या जिवावर बाकीचे मोठे झाले पण मलाच श्रीमंत होता आले नाही, त्यात त्यांचा काय दोष? असे म्हणून ते शांत रहात. सर्वाधिक पीक देणा-या एचएमटी या तांदळाच्या वाणाचे दादासाहेब खोब्रागडे हे संशोधक होते, जनक होते. या गोष्टीचा त्यांनी कधी अभिमान बाळगला नाही की कसला अहंकार केला नाही. १९८१ पर्यंत पटेल-३ नावाचे वाण सगळीकडे प्रचलित होते. दादांनी शेतात हेच वाण लावले. धान अगदी भरात असताना त्यांना त्यात काही वेगळ्या ओंब्या दिसल्या. कुतूहल म्हणून त्यांनी ओंब्यांची बियाणे अन्य धानाशी क्रॉस केली. क्रॉस केलेल्या या धानाचे दादांनी तीन-चार वर्षे पीक घेतले. या बियाण्यांचा वापर केला तर पीक लवकर येते, त्याचा दर्जाही चांगला असतो. दादांच्या या चमत्काराची बातमी पंचक्रोशित पसरली आणि मग दरवर्षी शेकडो शेतकरी या बियाणांसाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कृषी क्षेत्रात क्रांती करणारे फार मोठे संशोधन आपण केल्याचे त्यांच्या मनातही कधी नव्हते. दादांच्या दृष्टीने तो एक साधा प्रयोग होता. 

दादांच्या वाणाची कीर्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठापर्यंत पोहोचली. विद्यापीठाचे दोन संशोधक दादांना भेटायला आले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आता आपले संशोधन विद्यापीठ स्वीकारेल, असे दादांना वाटत होते. पण घडले विपरीत. काही दिवसांनी कृषी विद्यापीठाने बदमाशी करीत हेच वाण एचएमटी-पीकेव्ही नावाने बाजारात आणले. विद्यापीठाने फसवले तरी दादा स्थिर राहिले. दादांचे संशोधन सुरूच होते. पुढच्या दहा वर्षात त्यांनी नांदेड-९२, नांदेड-हिरा, नांदेड-चिनोर, डीआरके अशा कितीतरी वाणांचा शोध लावला. त्यावेळच्या सरकारने त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. पण ते पदकही नंतर नकली निघाले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांना वर्षभर दहा हजार रुपये दर महिन्याला मदत केली. बाकी कोणीही त्यांची दखल घेतली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. दादांच्या अखेरच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या उपचारासाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत दिली. पण या कृषीक्षेत्राल मोठय़ा व्यक्तिला उपेक्षाच पदरी पडली. आज शेतक-यांना संजीवनी देणारे संशोधन करणारा पोशिंदा जन्माला जसा आला तसाच रिकाम्या हाताने गेला. पंतप्रधान मोदींनी दादासाहेबांच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, कारण सर्वात प्रथम त्यांनीच दादासाहेबांना मदत केली. हि-याची पारख जवाहिराला असते तसाच हा प्रकार होता. आता सरकारी पातळीवर त्यांच्या कुटुंबियांवर अनुकंपा करण्याची गरज आहे.

http://prafullaphadkemhantat.blogspot.com/2018/06/blog-post_5.html