♥ #Updates : ⏩ जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.⏩ १३ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार.⏩.⏩

मातीतला इहवादी संशोधक

     डॉ धनराज खानोरकर     

सोमवारला संशोधक दादाजी खोब्रागडेंना त्यांच्याच शेतात मुलगा मिञदीपांनी, मुलगी वीणा यांनी असंख्य जनसमुदायासमोर दादाला चिताग्नी दिला . एका सर्वोत्तम ध्यासपर्वाचा अंत झाला,पण दादाजींचे कार्य चिरस्मरणात नक्कीच राहणार आहे. या कष्टपैलू मातीतल्या माणसाला ,प्रयोगशील कलावंताला आमचा पोशिंदा विसरु शकणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हीं 'एच .एम. टी.'चा भात चवीने खाऊ तेव्हा तेव्हा त्याच्या जनकाचा म्हणजेच या कष्टपैलू दादाचा नाव नक्कीच घेऊ. मिलमालकाच्या हातावरील 'एच एम टी' घडयाळ पाहून या साध्याभोळ्या संशोधकाने आपल्या लोकप्रिय धानवाणाला क्षणार्धात 'एच एम टी ' हे नाव बहाल केले होते. 

आता स्वंयपूर्ण खेडयांसाठी झटणारे अडयाळ टेकडीवरील गीताचार्य तुकारामदादा अन् खेडयातील शेतक-यांची धानढोली भरणाण्यासाठी नविन वाण शोधणारे याच परिसरातील खोब्रागडेदादा आमची ओळख झाली आहे. चंद्रपूर जिल्हा जसा वाघाचा तसाच तो तुकारामदादाचा अन् खोब्रागडेदादाचाही, असे येणा-या पीढीला म्हणावेच लागेल! याचे कारणही तसेच आहे ,जागतिक कीर्तीचेकृषिरत्न,कृषिभूषण,आपल्या तोकडया शेतातून अहोराञ संशोधन करून नऊ धनाचे वाणं शोधणारा जीवनधर्मी, मातीशी इमान राखणारा ज्ञानपिंपळ,देशातल्या तमाम पोशिंद्याच्या व्यथेची व्यवथा करणारा लोकप्रिय ' एच. एम. टी. ' धानावाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी रविवारी सायंकाळी गडचिरोली येथिल 'सर्च 'मध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला,आणि एक अनुभव समृध्दीच्या सागराची उबदार पाकळी निमाल्याचा अनुभव आल्याचे झाले. दादाजी गेले अन् कृषिक्षेञीतील इहवादी मातीचा संशोधक हरविल्याचे दुःख आता सर्वांना झाले आहे.
दादाजी खोब्रागडे हे आमच्या परिसरातील .ब्रह्मपुरी जवळील नागभीड तालुक्यातील नांदेड या छोटयाशा दूर्लक्षित खेडयातले. घरी दीड एकर जागा. एक मिञजीत नावाचा मुलगा, इंदिरा नावाची सून, मनीष, विजय आणि दीपक ही नातवंड. याशिवाय दादाजीवर जीव ओवाळून टाकणारा बराच आप्तपरिवार आता त्यांच्या मागे हळहळतो आहे. आमच्या ब्रह्मपुरीच्या 'शतायू ' हाॅस्पीटलमध्ये दादाजी खोब्रागडे अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे दाखल झालेत. डॉ भारत गणवीरांनी त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्नही केलेत पण 79 वर्षाचे दादाजींची प्रकृती साथ देईनात. पुढे नागपूर नंतर 'अभय बंग' च्या 'सर्च ' मध्ये दादाजीची प्राणज्योत मालवली. पण दुर्दैवाचे दशावतार एका जागतिक कीर्तीच्या संशोधकाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भोगावे लागले, का? तर तो या आपल्या कृषीप्रधान देशातील खेडयातला एक गरीब शेतकरी असल्यामुळे, त्यांच्याजवळ कुण्या पुढा-याचा वशीला नसल्यामुळे, त्यांच्यावर मंञ्यासंञ्याची, आमदार, खासदाराची मेहरनजर नसल्यामुळे ? असे अनेक प्रश्न आता लोकं चघळायला लागली आहेत.
शेवटपर्यंत दादाजीला दारिद्रयाशी दोन हात करावे लागलेत.ब्रह्मपुरीला असतांना प्रसारमाध्यमांनी ही बाब हेरली तेव्हा मुख्यमंञी निधीतून दोन लाख रुपयाची आर्थिक मदत त्यांना मिळाली.हा अन्नदादा ऐरवी आयुष्यभर दुर्लक्षितच राहिला. मातीशी इमान राखणा-या दादांनी जागतिक कीर्तीच्या 'फोर्ब्स'मध्ये 2010साली ग्रामीण उद्योजकांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले. शरद पवारांपासून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत दादाजी पोहचलेत, पण आयुष्याच्या संध्याकाळी या घामाचे गुलाबपाणी करणा-या संशोधकाला भरीव आर्थिक मदत कुणी केली नाही हे आपल्या व्यवथेचे दुर्दैव नाही काय?
या अस्वथ वर्तमानाची स्पंदने आता फक्त टीपली जातील. देशातला संशोधक, साहित्यिक, कलावंत, पञकार अखेरपर्यंत समाजाला काहीतरी आपल्यापरिने देत असतो. समाज त्याने दिलेले घेतही असतो. पण व्यवथा काटेरी खलनायकी करुन चांगल सांगणा-यांनाच टांगायला लागते. मान्य आहे की, दादाजीचा वृध्दपकाळ होता,पण उमेदीच्या काळातही दादाजीच्या वाटयाला पुरेसे आले नाही हे खरे आहे.त्यांनीभारतात कृषिक्षेञात क्रांती होत असतांना अनेकांना लाजवील अशी प्रतिक्रांती करुन शेतीसंस्कृतीची नववाट- पहाट निर्माण केली. अनेक शेतक-यांची, शेतमजूरांची भूक दादाजींनी भागविली. निरपेक्ष, श्रेयाचे तुप आपल्या पोळीवर त्यांनी घेतले नाही. 1983 च्या सुमारास त्यांनी आपल्या तुटपुंज्या शेतीत 'राञ न् दिन युध्दाचे प्रसंग 'करुन संशोधनाचे चक्र फिरविले. लोकप्रिय एच एम टी, विजय नांदेड ,नांदेड 92,नांदेड हिरा, डी आर के, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच एम टी, डी आर के टू असे नऊ तांदूळचे वाणं शोधून काढले . या दादाजीच्या क्रांतीमुळे देशातल्या तमाम शेतक-यांना विक्रमी उत्पन्न होऊन धान्यकोठारे भरली.' एच एम टी 'हे तांदूळ इतके लोकप्रिय झाले की, त्याला बाजारात सर्वात अधिक भाव मिळाला. 'पाहायला बारीक अन् खायला खारीक - रुचकर ' अशी त्याची ख्याती होती. 1985 च्या काळात दादाजी खोब्रागडे एक उत्तम संशोधक म्हणून समोर आले. दादाजीची दखल आता इलेक्ट्रॉनिक मीडियापासून प्रिन्ट मिडियापर्यंत व्हायला लागली. अनेक पुरस्कार देण्यात आले. या कलाकाराच्या कलाकृतीच्या कैलासलेणीची सर्वञ वाहवा झाली. या मेघमल्हार संशोधकाने अविरत कार्य चालू ठेवून कृषिक्षेञातील काळाच्या पडद्यावर आपले नावही कोरले खरे,परंतु 'आयुष्याच्या शेवटाला कोणी नाही सोबती ' हे दुःख त्यांच्या पदरात पडले. दादाजीच्या निधनाने एक कष्टपैलू संशोधक काळाच्या पडद्याआड गेला. दादाजीच्या शेतीतील नशेतली नशा संपली.
शेवटी काय तर सुखी माणसं कधी संशोधक, कलावंत, कवी होऊ शकत नाही , म्हणूनच त्यांना आपल्या उभ्या हयातीत 'दुःखाचा स्वामी' व्हावे लागले की काय? दादाजींनी दुःखाचे अश्रू सांभाळित जाता जाता सर्वांच्या अतःकरणाला पान्हा फोडला पण सर्जनाचा नवीन प्रदेश निर्माण केला,अशा या शहामृगी मातीतल्या इहवादी संशोधक दादाला माझा शतशः प्रणाम!

ब्रह्मपुरी, जि - चंद्रपूर
भ्रम. 9403304543