♥ #Updates : ⏩ जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.⏩ १३ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार.⏩.⏩

The story of HMT Rice innovator late Khobragade demonstrates tragic story of Indian farmers

   Sunita Mudaliar    
Executive Editor

How many people had even heard of Dadaji Khobragade, till he passed away recently?Not many, I am sure. Belonging to an agricultural family, and being a journalist even I had not heard his name, till his sickness, his family’s lack of funds for his treatment and his (untimely) death made headlines for a few days.


How many consume, or at least have heard of HMT rice?

Almost everyone, I am sure. It is THE most popular brand of rice in Vidarbha, and Central India, and people swear by it. Many prefer to use it even for ‘special’ rice preparations like Biryani!

On the other hand, it is a popular rice to grow among paddy farmers of Central India. It is largely pest resistant and considered a low input – high yield variety.

So the person who really developed this variety should have earned millions in Royalty, right?

No. He died in abject poverty and penury.

That is right, Dadaji Khobragade was the Dalit, poor farmer who came up with not just HMT, but ten other varieties of rice, experimenting in his small one and half acre farm in village Nanded of Chandrapur District.

The story of HMT rice and Khobragade goes thus:

(from IIPTA web site)

Dadaji Khobragade, who is a well known person in farmer’s fraternity due to HMT seeds and also his publicity of being considered one of the ‘Seven most powerful rural entrepreneurs’ is in news again. This time he is in news because one of the modifications of his famous HMT seeds has been registered under Protection of Plant Variety and Farmer’s Rights Act (PPV&FR Act). HMT seeds got its name from the famous HMT watches. These are said to yield much higher than other varieties and according to Khobragade it tastes better too.

STATS
· Dadaji Khobragade noticed few unusual looking rice seed in his paddy field, which he collected and replanted season after season till he developed HMT seeds (most popular rice variety).

When HMT became sought after in early 1990s, Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapith University borrowed 5kgs of HMT seeds from Khobragade to conduct experiments.

· After 4 years University released a new variety of ‘pure’ and improved form of HMT which came to be known as PKV HMT.

·According to news article in Down to Earth, VC of the University stated that the original seed may have come from Khobragade, but now it is entirely the University’s intellectual property (IP).

·In February, 2009 University filed application for PKV HMT to be registered.

·The Certificate of Registration (CoR) number 106 of 2012 for Rice Variety PKV HMT was granted to it and was published in Plant Variety Journal’s October, 2012 edition.

Some stats which were missing in the journal:

·Under paragraph (8) of the CoR where the applicant has to disclose the “Name and address of contributor, nature and amount of the contribution or the community knowledge used in the development of the plant variety,” the University has stated “N/A.” This is surprising given the news reports and the information on the National Innovation Foundation’s website which clearly identify Khobragade as being the developer of the HMT variety and PKV HMT as being an improved version of HMT.

·The University also does not consider its PKV HMT variety as being a variety “essentially derived” from HMT and provides “N/A” as the response to the question under paragraph (7) of the CoR, which seeks “In case of ‘essentially derived variety’, the details of the ‘initial variety’ from which the ‘essentially derived variety’ is claimed to have been derived.”

Thus a state funded Agricultural university, instead of lauding and appreciating the research work done by a ‘mere farmer’ working alone – something that the highly paid PKV scientists should have been doing – chose to hijack his work and the rice developed by him!

All Khobragade got from the government was a Krushi Bhushan Puraskar accompanied by a ‘Gold medal’ which also turned out to be made of Copper, a fact he discovered, when he tried to sell it as he needed cash! (After this controversy erupted they quickly replaced it with a genuine gold medal.)

When news that Dadaji Khobragade had suffered from a paralytic stroke and was brought to Nagpur, but the family could not afford the medical expenses came to the fore, state government offered a mere Rs. 2 lakhs ‘aid’ instead of underwriting his entire medical treatment – the least they could have done for a deserving, award winning farmer!

For lack of resources, his family had to finally take him to the Search Hospital in Gadchiroli, run by the idealistic Bang couple, who run an active hospice for the district’s poor tribal population, where he breathed his last.

But not appreciating Innovators, specially in the agri field, is not new to India. Consider the case of C.T. Patel:

Chandrakant T Patel was a young lecturer/ Scientist of Surat University who was the first agricultural scientist in the world to successfully develop Hybrid Cotton. All experiments to ‘cross’ and match two different varieties of cotton plants for more pest resistance and higher yield had failed the world over. It was considered impossible to do, till this scientist, working on the project for almost 20 years managed to do it and prove that it was agriculturally doable – not just in small lab sized trial plots, but actual farms, and commercially viable too.

When the news of this reached owners of Textile mills they rushed to find out more about this ‘hybrid cotton’ and this is how the world came to know about it.

(The undersigned was the first journalist to whom Dr. C.T. Patel spoke about the whole experience in 1975 – 76, so I can state the details.)

And how was Chandrakant Patel rewarded for this work?

He received a ‘Show cause notice and suspension order’ from his superior at the University! (He was accused of insubordination and ‘wasting’ his Department’s money’ for personal trials.)

It was only later when a hue and cry was raised about it, that the Sardar Patel University in Vallabh Vidyanagar bestowed a honorary D.Sc. degree on him in 1978.,

That is all this world famous scientist got though, till his end in 1990, he lived an ordinary middle class life living in a small house in Surat with his extended family.

But Dadaji Khobragade’s work is even more exemplary. Patel at least had the resources of the University at his disposal, plus he was getting paid a regular salary by the Surat University?

What kept Khobragade going? He was a small farmer with a small farm, a minuscule 1.5 acres. He was not even formally educated in agriculture! Yet passion and curiosity kept him experimenting and innovating. Till he reached his goal.

If we cannot appreciate and reward even such a farmer, imagine the plight of the rest?

मातीतला इहवादी संशोधक

     डॉ धनराज खानोरकर     

सोमवारला संशोधक दादाजी खोब्रागडेंना त्यांच्याच शेतात मुलगा मिञदीपांनी, मुलगी वीणा यांनी असंख्य जनसमुदायासमोर दादाला चिताग्नी दिला . एका सर्वोत्तम ध्यासपर्वाचा अंत झाला,पण दादाजींचे कार्य चिरस्मरणात नक्कीच राहणार आहे. या कष्टपैलू मातीतल्या माणसाला ,प्रयोगशील कलावंताला आमचा पोशिंदा विसरु शकणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हीं 'एच .एम. टी.'चा भात चवीने खाऊ तेव्हा तेव्हा त्याच्या जनकाचा म्हणजेच या कष्टपैलू दादाचा नाव नक्कीच घेऊ. मिलमालकाच्या हातावरील 'एच एम टी' घडयाळ पाहून या साध्याभोळ्या संशोधकाने आपल्या लोकप्रिय धानवाणाला क्षणार्धात 'एच एम टी ' हे नाव बहाल केले होते. 

आता स्वंयपूर्ण खेडयांसाठी झटणारे अडयाळ टेकडीवरील गीताचार्य तुकारामदादा अन् खेडयातील शेतक-यांची धानढोली भरणाण्यासाठी नविन वाण शोधणारे याच परिसरातील खोब्रागडेदादा आमची ओळख झाली आहे. चंद्रपूर जिल्हा जसा वाघाचा तसाच तो तुकारामदादाचा अन् खोब्रागडेदादाचाही, असे येणा-या पीढीला म्हणावेच लागेल! याचे कारणही तसेच आहे ,जागतिक कीर्तीचेकृषिरत्न,कृषिभूषण,आपल्या तोकडया शेतातून अहोराञ संशोधन करून नऊ धनाचे वाणं शोधणारा जीवनधर्मी, मातीशी इमान राखणारा ज्ञानपिंपळ,देशातल्या तमाम पोशिंद्याच्या व्यथेची व्यवथा करणारा लोकप्रिय ' एच. एम. टी. ' धानावाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी रविवारी सायंकाळी गडचिरोली येथिल 'सर्च 'मध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला,आणि एक अनुभव समृध्दीच्या सागराची उबदार पाकळी निमाल्याचा अनुभव आल्याचे झाले. दादाजी गेले अन् कृषिक्षेञीतील इहवादी मातीचा संशोधक हरविल्याचे दुःख आता सर्वांना झाले आहे.
दादाजी खोब्रागडे हे आमच्या परिसरातील .ब्रह्मपुरी जवळील नागभीड तालुक्यातील नांदेड या छोटयाशा दूर्लक्षित खेडयातले. घरी दीड एकर जागा. एक मिञजीत नावाचा मुलगा, इंदिरा नावाची सून, मनीष, विजय आणि दीपक ही नातवंड. याशिवाय दादाजीवर जीव ओवाळून टाकणारा बराच आप्तपरिवार आता त्यांच्या मागे हळहळतो आहे. आमच्या ब्रह्मपुरीच्या 'शतायू ' हाॅस्पीटलमध्ये दादाजी खोब्रागडे अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे दाखल झालेत. डॉ भारत गणवीरांनी त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्नही केलेत पण 79 वर्षाचे दादाजींची प्रकृती साथ देईनात. पुढे नागपूर नंतर 'अभय बंग' च्या 'सर्च ' मध्ये दादाजीची प्राणज्योत मालवली. पण दुर्दैवाचे दशावतार एका जागतिक कीर्तीच्या संशोधकाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भोगावे लागले, का? तर तो या आपल्या कृषीप्रधान देशातील खेडयातला एक गरीब शेतकरी असल्यामुळे, त्यांच्याजवळ कुण्या पुढा-याचा वशीला नसल्यामुळे, त्यांच्यावर मंञ्यासंञ्याची, आमदार, खासदाराची मेहरनजर नसल्यामुळे ? असे अनेक प्रश्न आता लोकं चघळायला लागली आहेत.
शेवटपर्यंत दादाजीला दारिद्रयाशी दोन हात करावे लागलेत.ब्रह्मपुरीला असतांना प्रसारमाध्यमांनी ही बाब हेरली तेव्हा मुख्यमंञी निधीतून दोन लाख रुपयाची आर्थिक मदत त्यांना मिळाली.हा अन्नदादा ऐरवी आयुष्यभर दुर्लक्षितच राहिला. मातीशी इमान राखणा-या दादांनी जागतिक कीर्तीच्या 'फोर्ब्स'मध्ये 2010साली ग्रामीण उद्योजकांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले. शरद पवारांपासून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत दादाजी पोहचलेत, पण आयुष्याच्या संध्याकाळी या घामाचे गुलाबपाणी करणा-या संशोधकाला भरीव आर्थिक मदत कुणी केली नाही हे आपल्या व्यवथेचे दुर्दैव नाही काय?
या अस्वथ वर्तमानाची स्पंदने आता फक्त टीपली जातील. देशातला संशोधक, साहित्यिक, कलावंत, पञकार अखेरपर्यंत समाजाला काहीतरी आपल्यापरिने देत असतो. समाज त्याने दिलेले घेतही असतो. पण व्यवथा काटेरी खलनायकी करुन चांगल सांगणा-यांनाच टांगायला लागते. मान्य आहे की, दादाजीचा वृध्दपकाळ होता,पण उमेदीच्या काळातही दादाजीच्या वाटयाला पुरेसे आले नाही हे खरे आहे.त्यांनीभारतात कृषिक्षेञात क्रांती होत असतांना अनेकांना लाजवील अशी प्रतिक्रांती करुन शेतीसंस्कृतीची नववाट- पहाट निर्माण केली. अनेक शेतक-यांची, शेतमजूरांची भूक दादाजींनी भागविली. निरपेक्ष, श्रेयाचे तुप आपल्या पोळीवर त्यांनी घेतले नाही. 1983 च्या सुमारास त्यांनी आपल्या तुटपुंज्या शेतीत 'राञ न् दिन युध्दाचे प्रसंग 'करुन संशोधनाचे चक्र फिरविले. लोकप्रिय एच एम टी, विजय नांदेड ,नांदेड 92,नांदेड हिरा, डी आर के, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच एम टी, डी आर के टू असे नऊ तांदूळचे वाणं शोधून काढले . या दादाजीच्या क्रांतीमुळे देशातल्या तमाम शेतक-यांना विक्रमी उत्पन्न होऊन धान्यकोठारे भरली.' एच एम टी 'हे तांदूळ इतके लोकप्रिय झाले की, त्याला बाजारात सर्वात अधिक भाव मिळाला. 'पाहायला बारीक अन् खायला खारीक - रुचकर ' अशी त्याची ख्याती होती. 1985 च्या काळात दादाजी खोब्रागडे एक उत्तम संशोधक म्हणून समोर आले. दादाजीची दखल आता इलेक्ट्रॉनिक मीडियापासून प्रिन्ट मिडियापर्यंत व्हायला लागली. अनेक पुरस्कार देण्यात आले. या कलाकाराच्या कलाकृतीच्या कैलासलेणीची सर्वञ वाहवा झाली. या मेघमल्हार संशोधकाने अविरत कार्य चालू ठेवून कृषिक्षेञातील काळाच्या पडद्यावर आपले नावही कोरले खरे,परंतु 'आयुष्याच्या शेवटाला कोणी नाही सोबती ' हे दुःख त्यांच्या पदरात पडले. दादाजीच्या निधनाने एक कष्टपैलू संशोधक काळाच्या पडद्याआड गेला. दादाजीच्या शेतीतील नशेतली नशा संपली.
शेवटी काय तर सुखी माणसं कधी संशोधक, कलावंत, कवी होऊ शकत नाही , म्हणूनच त्यांना आपल्या उभ्या हयातीत 'दुःखाचा स्वामी' व्हावे लागले की काय? दादाजींनी दुःखाचे अश्रू सांभाळित जाता जाता सर्वांच्या अतःकरणाला पान्हा फोडला पण सर्जनाचा नवीन प्रदेश निर्माण केला,अशा या शहामृगी मातीतल्या इहवादी संशोधक दादाला माझा शतशः प्रणाम!

ब्रह्मपुरी, जि - चंद्रपूर
भ्रम. 9403304543

खऱ्या संशोधकाला महाराष्ट्र मुकला

     महेश उपदेव 

विदर्भातील एका छोट्या गावात राहणारे दादाजी खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने कृषी संशोधक होते. एचएमटी तांदळाचे जनक असलेले दादाजी यांनी ‘एचएमटीवाले’ ही ओळखच त्यांच्या कृषी संशोधनाच्या कामाची पावती म्हणावी लागेल. नुकतेच त्याचं निधन झाले. चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदेड या छोट्य़ाशा गावातील दादाजी यांनी अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी एचएमटी तांदळाचे नवनवीन वाण तयार करून हे वाण हिंदुस्थानात प्रसिद्ध केले. 

खोब्रागडे म्हणजे एका माणसाचे कृषी विद्यापीठ होते. जे राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांना जमले नाही ते अवघा तिसरा वर्ग शिकलेल्या दादाजींनी करून दाखविले. पूर्व विदर्भातील धान पिकाला देशात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी वेगवेगळे प्रयोग व संशोधन करून नऊ वाण विकसित केले. दादाजींचे वाण घेऊन कृषी विद्यापीठातील काही लोकांनी टेंभा मिरविला, पण दादाजी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर रहात आपले कार्य करीत राहिले. त्यांच्या संशोधनाची दखल राज्य व केंद्र सरकारला घ्यावी लागली. दादाजींचा जन्म चंद्रपूर जिह्यातील वरोरा तालुक्यातील खुटाळा येथे १० जुलै १९३९ रोजी झाला. वडिलांबरोबर भाताची शेती करताना त्यांनी आपले भात पीक कसे उत्कृष्ट दर्जाचे होईल यावर विशेष भर दिला होता. मजुरी करून पोट भरत असताना त्यांनी आपल्या छोट्य़ाशा शेतात भात पीक घेणे सुरू केले.

शेताच्या बांधावर त्यांना धानांमध्ये एक बारीक लोंब दिसले. ते पाहून त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी २०० ग्रॅम वाण एकत्रित केले. खरिपाच्या हंगामात जमा केलेले वाण शेताच्या एका कोपऱयात पेरले. १४० दिवसांनी या बीजरोपणातून पायलीभर धान मिळाले. त्यातून बारीक बारीक लोंब काढून दुसऱ्या वर्षी प्रयोग केला. हा प्रयोग पाहून पहिले गावकऱ्यांनी त्यांना वेड्य़ात काढले, पण त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता संशोधन सुरूच ठेवले. हा प्रयोग बघून त्याच गावातील भीमराव शिंदे यांनी दादाजींचे वाण लावून बघितले. त्यांना ९० क्विंटल धान मिळाले. हे धान कोणत्या नावाने बाजारात आणायचे हा प्रश्न दादाजींना पडला. त्यावेळी एचएमटी कंपनीचे घड्य़ाळ प्रत्येकाच्या मनगटावर दिसायचे. ते पाहून त्यांनी आपल्या भाताला एचएमटी नाव दिले. काहीच दिवसांत एचएमटी तांदळाला बाजारपेठेत मागणी वाढली आणि एचएमटी वाण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. हा शोध एका छोटय़ा शेतकऱयाने लावल्याची माहिती राज्यभरात पसरताच कृषी विद्यापीठातील संशोधकांचे डोळे उघडले. देशातील पाच राज्यांमध्ये एचएमटी तांदळाचे पीक लाखो हेक्टरमध्ये शेतकरी घ्यायला लागले. १९८३ मध्ये दादाजी खोब्रागडे तांदळाचे संशोधक म्हणून पुढे आले. ३५ वर्षांच्या काळात त्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग करून नऊ वाण संशोधित केले. विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, कारे, एचएमटी आणि झुंगधी अशी वाणांची नावे ठेवली. शरीर थकले तरी ते शेतात काम करायचे. डोळ्यांनी दिसत नसले तरी ते गावाला कशी लोकप्रियता मिळेल यासाठी नवनवीन प्रयोग करीत होते. या विविध संशोधनांमुळे त्यांना देशातील १२ नामांकित पुरस्कार मिळाले. ५ जानेवारी २००५ रोजी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दादाजींना अहमदाबाद येथे ५० हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. राज्य शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविले. दादाजींचे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना एक एकर शेती भेट देऊन त्यांचा गौरव केला. खऱया संशोधकाला महाराष्ट्र मुकला आहे. ‘एचएमटीवाले दादाजी’ म्हणून ते विदर्भात प्रसिद्ध होते.

उपेक्षा कृषी संशोधकांची!

        देवेंद्र गावंडे              


तांदळाचे हे वाण दादाजी रामाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधून काढलेले आहे यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पूर्व विदर्भ उत्तम प्रतीच्या तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. देशात आणि देशाबाहेर ज्या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे, त्यात ‘हिरा’ आणि ‘चिन्नूर’चा समावेश आहे. तांदळाचे हे वाण या भागातील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी  शोधून काढले आहे. उत्तम दर्जा आणि भरपूर उत्पन्न देणारी तांदळाची तब्बल नऊ वाणे शोधून काढणाऱ्या या संशोधकाच्या कामाची दखल ना कृषी विद्यापीठाने घेतली, ना सरकार नामक व्यवस्थेने! उपेक्षेच्या अंधाराशी झगडत हा संशोधक अखेर काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्यासारखे अनेक संशोधक आजही पिकांच्या नवनव्या जाती शोधून काढत आहेत. मात्र, त्यांची दखल घ्यावी असे कोणालाच वाटत नाही, हे या देशाचे दुर्दैव. 
पूर्व विदर्भ चांगल्या प्रतीच्या तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ‘धानपट्टा’ अशी ओळख असलेल्या या भागातील तांदूळ जगभरात निर्यात होतो. येथील तांदळाच्या बाजारपेठा सदैव गजबजलेल्या असतात. देशात आणि देशाच्या बाहेर ज्या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे, त्यात ‘हिरा’ आणि ‘चिन्नूर’चा समावेश आहे. तांदळाचे हे वाण दादाजी रामाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधून काढलेले आहे यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. या तांदळाचे पीक घेऊन आजवर लाखो शेतकरी समृद्ध झाले. या तांदळाची विक्री करून व्यापारी गब्बर झाले. हाच तांदूळ परदेशात पाठवून निर्यातदारांनी प्रचंड पैसा कमावला. पण ज्याने हे वाण शोधले तो संशोधक मात्र शेवटपर्यंत फाटकाच राहिला. गेल्या रविवारी दादाजी गेले. तत्पूर्वी पंधरा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मृत्यूशी लढण्यासाठीसुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अख्खे आयुष्य तांदळाची नवनवी वाणे विकसित करण्यात घालवलेल्या या संशोधकाजवळ वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसणे, त्यासाठी प्रसार माध्यमांना बातम्या द्याव्या लागणे, त्यांच्या मदतीसाठी सामान्य शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करणे, हे सारेच कमालीचे वेदनादायी तर आहेच; शिवाय व्यवस्थेचे अपयश ढळढळीतपणे अधोरेखित करणारेही आहे. खरे तर सध्या सर्वाधिक संकटांचा सामना कृषिक्षेत्राला करावा लागतो आहे. या क्षेत्रात आमूलाग्र बदलाची भाषा राज्यकर्त्यांपासून सारेच जण करतात. मात्र, त्या बदलासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या दादाजींच्या नशिबी मात्र उपेक्षाच येते. गेल्या तीन दशकांत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित करणारे आणि ही सर्व वाणे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभलेल्या या अवलिया संशोधकाला जवळ करावे, त्याला सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात, आर्थिक मदत करावी असे एकाही कृषी विद्यापीठाला वाटू नये, याकामी आपण पुढाकार घ्यावा अशी बुद्धी सरकारलाही सुचू नये, हे केवळ लाजिरवाणेच नाही तर भयंकर अस्वस्थ करणारे आहे. दादाजी ज्या नांदेड गावात राहायचे, तेथून काही किलोमीटरवर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. तिथे काम करणाऱ्या सुटाबुटातल्या संशोधकांनासुद्धा दादाजींची दखल घ्यावी असे स्वत:हून कधी वाटले नाही. दादाजींचे ‘एचएमटी’ वाण बाजारात कमालीचे लोकप्रिय झाले. शेतकरी या तांदळाचे बियाणे मिळावे म्हणून धडपडू लागले. या वाणाची कीर्ती सर्वदूर पसरली. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या न्युक्लियर अ‍ॅग्रिकल्चर विभागातून संशोधक म्हणून निवृत्त झालेले आणि तांदळावर काम करण्यासाठी विदर्भात स्थायिक झालेले डॉ. शरद पवार यांच्यापर्यंत दादाजींचे नाव पोहोचले. ते स्वत: दादाजींना घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठात गेले. परंतु तेथील संशोधकांनी या वाणाला शास्त्रीय आधार नाही, असे सांगत त्यांच्या या संशोधनावरच पाणी फिरवले. दादाजी हिरमुसले. परंतु डॉ. पवार हार मानायला तयार नव्हते. त्यांनी बराच पत्रव्यवहार केल्यावर विद्यापीठाने या वाणाची शुद्धता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यात हे वाण अस्सल निघाले. नंतर विद्यापीठाने हेच वाण ‘पीकेव्ही एचएमटी’ या नावाने बाजारात आणून दादाजींचे नाव वगळले. त्यामुळे निराश झालेल्या दादाजींनी नंतर स्वत:च्या संशोधनावर सरकारची मोहोर उमटविण्याचा नादच सोडून दिला. या कटू अनुभवानंतर त्यांनी तब्बल आठ वाणे विकसित केली. तर त्यांच्याच भागात असलेल्या विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला २००७ मधील ‘भुजंग’ वगळता इतर कोणतेही वाण तयार करता आले नाही. हे ‘भुजंग’सुद्धा दोन वर्षांत बाजारातून हद्दपार झाले. मात्र, दादाजींची वाणे आजही बाजारात दबदबा कायम ठेवून आहेत. ज्यांना संशोधनासाठी गलेलठ्ठ पगार मिळतो, ते अपयशी आणि ज्याच्याजवळ घर चालवायलासुद्धा पैसे नाहीत त्याचे संशोधन यशस्वी- असा प्रकार सतत घडत राहिला. मात्र, सरकार नावाच्या यंत्रणेने यात कधी लक्ष घातले नाही. दादाजींचे नाव फोर्ब्सच्या यादीत झळकल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गावात जाऊन दादाजींचा सत्कार केला. त्यांना पाच एकर शेती दिली. पण विद्यापीठाची दारे तुमच्यासाठी मोकळी आहे, असे त्यांनी म्हटले नाही किंवा दादाजींच्या संशोधनाला व्यासपीठ का देत नाही, असे कृषी खात्याला कधी सुनावले नाही. एकूणच संशोधकाकडे बघण्याची सरकारची दृष्टी किती अधू आहे याचा अनुभव दादाजींच्या प्रकरणात वारंवार येत राहिला. अशा संशोधकांसाठी केवळ सन्मान कामाचे नसतात, त्यांना संशोधनासाठी आर्थिक बळ देणे गरजेचे असते. सरकारने ते कधीच केले नाही. दादाजींनी विकसित केलेली वाणे केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या ‘प्रोटेक्शन ऑफ प्लँट व्हरायटीज अ‍ॅन्ड फार्मर्स राईट’ या संस्थेकडे नोंदणीकृत करावीत यासाठी अनेकांनी आग्रह धरला. कुणी संशोधनाचे पेटंट घ्या, असे सुचवले. पण व्यवस्थेचा कटु अनुभव सतत घेतलेल्या दादाजींनी त्या मार्गाने कधी जायचेच नाही असे ठरवून टाकले होते. सरकारी अनुभवामुळे आलेले कडवटपण त्यांनी आयुष्यभर उरी बाळगले, पण त्याची जाहीर वाच्यता करण्याचा असमंजसपणा त्यांनी कधीच दाखवला नाही. दादाजींनी वाण तयार करायचे, शेतकऱ्यांनी ते बीज एकमेकांकडे फिरवत वापरायचे, भरपूर पीक घ्यायचे हा सिलसिला शेवटपर्यंत सुरू राहिला. लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलवून टाकणाऱ्या दादाजींची आर्थिक विपन्नता खरे तर सरकारने स्वत:हून पुढाकार घेत दूर करायला हवी होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे लोकाश्रय लाभलेल्या दादाजींना राजाश्रय कधीच मिळू शकला नाही. दादाजींच्या पावलावर पाऊल ठेवत पूर्व विदर्भात अलीकडच्या काळात तांदळाच्या क्षेत्रात अनेक नवे प्रयोग सुरू झाले. तांदूळ निर्यातीत आघाडीवर असलेल्या तळोधी बाळापूर या गावातील सुधाकर पोशेट्टीवार यांनी काही नवी वाणे शोधून काढली. भंडाऱ्याच्या अविल बोरकर यांनी विस्मरणात गेलेली जुनी वाणे शोधून ती पुन्हा बीज बँकेत जमा करण्याचा मोठा प्रयोग सुरू केला. साठ वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या ‘पिवळी लुचई’, ‘दुबराज’, ‘हिरानक्की’ या वाणांचा प्रचार सुरू केला. त्यांचा हा बीज बँकेचा प्रयोग पूर्व विदर्भातील सहा तालुक्यांत कमालीचा यशस्वी ठरला आहे. दरवर्षी हजारो शेतकरी त्यांच्याकडून बियाणे घेऊन जातात. यात अट एकच असते : दहा किलो बियाणे नेले तर उत्पादनानंतर २० किलो परत आणून द्यायचे. शेतकरी आनंदाने ही अट पाळतात. या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी १८ जुनी वाणे पुन्हा नव्याने विकसित करून वापरली. त्यावर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही. बोरकर यांनी मधुमेहावर रामबाण उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या तांदळाची लागवड केली. तीसुद्धा यशस्वी ठरली. या तांदळाला परदेशात प्रचंड मागणी आहे. केवळ लागवडीवर हे प्रयोग थांबले नाही तर बियाण्यांची शुद्धता कशी करायची, याचेही प्रशिक्षण शेकडो शेतकऱ्यांना देण्यात आले. या सर्व घडामोडींपासून कृषी खाते आणि कृषी विद्यापीठ गेली अनेक वर्षे दूर होते. जुन्या वाणांच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रयोग कृषी अधिकारी बघायचे, अनेकदा शेतातून ओंबी चोरून न्यायचे; पण मदत करायचे नाहीत. दोन वर्षांपासून मात्र सरकारी यंत्रणेची दृष्टी थोडी बदलली आहे असे बोरकर सांगतात. तरीही अशा प्रयोगांना उचलून धरणे, मदत करणे, ते सर्वदूर पोहोचवणे यांत सरकारी यंत्रणा अजूनही मागेच आहे. अविनाश जाधव या अभियंता असलेल्या तरुणाने शेतकऱ्यांच्या पिकांचा प्राण्यांपासून बचाव व्हावा म्हणून अवघ्या पाच हजारांत सौरकुंपण तयार केले. बाजारात हेच कुंपण वीस हजाराच्या पुढे आहे. कृषी खाते शेतकऱ्यांना कुंपणासाठी अनुदान देते. या खात्याने या कमी खर्चातील कुंपणाचा प्रसार करावा यासाठी अविनाश जाधव यांनी जंग जंग पछाडले; पण सरकारी बाबूंनी त्यांना बिलकूल दाद दिली नाही. जाधव यांचा हा प्रयोग उत्तराखंड राज्याने उचलून धरला. परंतु तरीही महाराष्ट्रातील यंत्रणेची झोप काही उडाली नाही. दादाजी, बोरकर वा जाधव एवढय़ावरची ही यादी थांबत नाही. नवे प्रयोग, नवे संशोधन करणारे अनेक जण आहेत, पण त्यांच्याकडे कायम उपेक्षेने बघण्याचा सरकारी दृष्टिकोन आजही कायम आहे. या नवनिर्मितीला नाकारणारी यंत्रणा स्वत: तरी काही नवे संशोधन करते का, याचे उत्तरही ‘नाही’ असेच आहे. राज्यात बियाणे महामंडळ आहे. त्यांच्याकडे बीज उत्पादनाचा कसला ठोस कार्यक्रमच नाही. तांदळाचे क्षेत्र घेतले तर अलीकडच्या दहा वर्षांत कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या एकही वाणाचे नाव कुणी सांगू शकणार नाही अशी स्थिती आहे. या देशात संशोधनाला काडीचीही किंमत नाही हे कटू सत्य दादाजींच्या निधनाने पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा संशोधकाला निदान मरण तरी सन्मानाने यावे यासाठी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी शेवटच्या क्षणी दादाजींसाठी केलेली धावपळ बरेच काही सांगून जाणारी आहे.

लोकसत्ता 
devendra.gawande@expressindia.com

सुवर्णपदका ऐवजी केवळ सोन्याचा मुलामा


एचएमटी भाताचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सांयकाळी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. या संशोधकाला २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. परंतु यावेळी देण्यात आलेल्या ३० ग्रॅम वजनाच्या सुवर्णपदकच्या ऐवजी केवळ सोन्याचा मुलामा देण्यात आलेले पदक देण्यात आले होते. म्हणजेच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शासकीय व्यवस्थेने येथेही एका संशोधकाची क्रुर थट्टा केली होती. 
कसे आले होते प्रकरण उजेडात..
२००७ साली दादाजी खोब्रागडे यांना कृषी विभागाने संशोधनाबद्दल सुवर्णपदक जाहीर केले. यावेळी ३० ग्रॅम वजनाचे एक सुवर्णपदक त्यांना देण्यात आले होते. परंतु दादाजींची परिस्थिती हलाखीची झाल्याने त्यांनी ते सुवर्णपदक विक्रीसाठी सोनाराकडे नेले. त्यावेळी सोनाराने त्यांना फक्त ५०० रुपये भाव दिला. दादाजींने त्यांना ३० ग्रॅम सोन्याचा भाव फक्त पाचशे रुपये कसा असा प्रश्न विचारला. त्यावेळी सोनाराने सांगितले, की या पदकाला फक्त सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. यावेळी सुवर्णपदाकांमधील भ्रष्टाचार उजेडात आला होता.

सरकारी नियमानुसार सुवर्णपदकात किती ग्रॅम सोने...
कृषी विभागाने त्यावेळी सुवर्णपदक बनविण्यासाठी दिलेल्या कंत्राटामध्ये स्पष्ट केले होते, की हे सुवर्णपदक ३० ग्रॅम सोन्याचे असावे. तसेच त्यावेळी एका सुवर्णपदकांची तत्कालीन किंमत ही ३२ हजार २५० रुपये एवढी होती.


चंद्रपूर, विदर्भ असो वा राज्य आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आपले संशोधन मुक्तहस्ते दिले. त्यांनी विकसित केलेली एचएमटी ही धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.
सामान्यातून आलेल्या या धान संशोधकाची ३ वर्षांपूर्वी लकवाग्रस्त झाल्याने बिकट अवस्था झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना ५ एकर शेती संशोधनपर दिली होती. मात्र धान शेत नापिकी झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली. आपले ज्ञान उदारपणे लोकांना वाटणाऱ्या दादाजींना आयुष्याच्या उत्तरार्धात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. शेवटी त्यांच्या मुलाने शासनाकडे मदतीची मागणी केली. फेसबुकवर सुरू असलेले 'दादाजी खोब्रागडे मदत अभियान' शासन स्तरावर खळबळ उडवून गेले.

eenad Marathi, Chandrapur

‘एचएमटी’वाले दादाजी

    देवनाथ गंडाटे    


दादाजी खोब्रागडे म्हणजे एका माणसाचं कृषी विद्यापीठच. जिज्ञासा आणि संशोधनासाठी वय अथवा शिक्षणाचा काहीच संबंध नसतो, हे दादाजींनी दाखवून दिले. तिसरा वर्ग शिकलेल्या दादाजींनी पूर्व विदर्भातील धान पिकाला लोकप्रियता मिळवून दिली, ती त्यांच्या एचएमटी वाणाने. वय झाले तरी आजही त्यांचे प्रयोग थांबलेले नाहीत. त्यांनी वेगवेगळे प्रयोग आणि संशोधन करून धानाचे ९ वाण विकसित केले. संपूर्ण आयुष्य शेती आणि भाताच्या वाण संशोधनात घालावल्यानंतरही ते थकले नव्हते़ आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतीशी एकनिष्ठ राहिले़ पुढल्या महिन्यात ते वयाची ऐन्शी गाठणार होते़ मात्र, शरीर थकले़ त्यांना पक्षघात झाला आणि महिनाभरापासून ते वैद्यकीय उपचार घेत असताना रविवार, दि़ ३ जून रोजी त्यांचे देहावसान झाले़ अंगावर सफेद सदरा अन् धोतर. कधी निळ्या रंगाचा कोट आणि टोपी. डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा घातलेला हा शेतीतला माणूस अखेर जगाचा निरोप घेऊन गेला़
दादाजी खोब्रागडे यांचा जन्म वरोरा तालुक्यातील खुटाळा (ता. चिमूर) येथे १० जुलै १०३९ रोजी झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. तिसºया वर्गापर्यंत गावातच शिक्षण घेतले. अधूनमधून वडिलांसोबत शेतात हातभार लावत असायचे़ तरुण असतानाच दुष्काळ पडला. शेतात नापिकी झाली. कर्जाचा डोंगर झाला. शेती बुडाली. त्यामुळे या गावात राहून पोट भरण्याइतपत रोजगार नव्हता. अर्धपोटी राहून कसेबसे दिवस काढले. खुटाळा गाव सोडून नांदेड (ता. नागभीड) ला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. या गावात वडिलांचे आयुष्य गेले होते. त्यामुळे गावाला अखेरचा दंडवत करताना डोळे पाणावले होते. पण, नाइलाज होता. तळोधी गावापासून पश्चिमेस सात-आठ किलोमीटर अंतरावर नांदेड गावात स्थायिक झालेत. तिथं छोटीशी झोपडी बांधली. मजुरी करून पोट भरत असतानाच येथेच शेती घेतली. या पट्ट्यात केवळ भातपीक व्हायचे. बांधावरून पिकाची पाहणी करीत असताना धानांमध्ये एक बारीक लोंब दिसले. ते बघून ते आश्चर्यचकीतच झालो होतो. इतकी वर्षे भाताची शेती केली. पण, हे लोंब थोडे वेगळेच होते. ते मी तोडले. घरी आणले. त्यातूनच जिज्ञासा वाढली. आणखी असेच काही लोंब शोधत होते. धान आता निसवण्याचा स्थितीत होता. अंदाजे २०० ग्राम बारीक वाण एकत्रित केले. त्यांना सहा-सात महिने जपून ठेवले. उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच खरिपाची तयारी केली. धानाची पेरणी केल्यानंतर बांधाच्या एका कोपºयात संग्रहित झालेले बारीक वाणाचे बीजरोपण केले. साधारणत: १४० दिवसांनी पायलीभर उत्पादन झाले. त्यातून आणखी बारीक लोंब वेगळे काढले. दुसºयाही वर्षी तोच प्रयोग केला. दिसायला सुंदर, खाण्यास चवदार आणि कमी जागेत जास्त उत्पादन देणारे धान असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला. पण, हा प्रयोग करताना शेजारच्यांनी वेड्यातच काढले होते. 
कामधंदे सोडून काहीतरी फाजील उद्योग करतो, असे टोमणे मारत होते. तो शाब्दिक मार सहन केला. पण, आपल्या कामाच्या दिनचर्येत कधीही खंड पडू दिला नाही. गावातील भीमराव शिंदे यांनीही या वाणाची पेरणी केली. त्यांना पहिल्याचवर्षी ९० क्विंटलचे उत्पादन मिळाले. हा यशस्वी प्रयोग बघून अन्य शेतकºयांनाही मोह झाला. त्यांनीही या धानाची लागवड केली. पहिल्या हंगामात निघालेले हे अनामिक धान तळोधीच्या बाजारपेठेत गेले. पण, या धानाची कोणत्या नावाने खरेदी करायची, हा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीला पडला. तेव्हा एका शेतकºयाच्या हाताच्या मनगटाला घड्याळ दिसली. ती एचएमटी कंपनीची होती. घड्याळाची विश्वासार्हता बघून तेच नाव या धानाला देण्यात आले. एका गावातून दुसºया गावात, तालुक्यातून शहरात गेलेल्या या एचएमटीला मोठी पसंती मिळत गेली. संपूर्ण चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतकºयांनी एचएमटीचे पीक घेतले. जो शेतकरी या धानाची लागवड करेल तो प्रगत, असा विश्वास निर्माण झाला. पाच राज्यात सुमारे एक लाख हेक्टरवर एचएमटीची लागवड होते. एचएमटी आज तोंडपाठ झालीय. १९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. गेल्या ३५ वर्षांमध्ये केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून धानाचे नऊ वाण संशोधित केले आहेत. विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि सुगंधी अशी त्यांची नावे आहे. वय वाढले आणि शरीर थकले. शिवाय डोळ्याला नीट दिसत नाही. मुलगा मित्रजितच्या मदतीने हे संशोधन आजही सुरू होते़..

तिसरी शिकलेल्या शेतकरी संशोधकाचा शेवट हलाखीतच

        प्रशांत ननावरे      
बीबीसी मराठी


"बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला त्यांची पेटंट किंवा रॉयल्टी मिळत नाही. नुसत्या पुरस्कारानं पोट भरत नाही. शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला."
- मित्रजित खोब्रागडे

तांदळाच्या नवनव्या वाणाचा शोध लावणारे विदर्भातील कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचं नुकतंच निधन झालं. या धानसंशोधकाची जगभरात दखल घेतली गेली, पण तरीही शेवटपर्यंत आर्थिक विवंचना कायम राहिली. वेळेवर मदत मिळाली असती तर ते अजून जगले असते, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात. दादाजींचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलेल्या त्यांच्या बाबाजींच्या काही आठवणी आणि अनुभव.
खरंतर 2015 साली बाबाजी पहिल्यांदा आजारी पडले तेव्हाच मदत मिळाली असती तर बाबाजींचा आजार इतका वाढला नसता. आजारपणातून ते बरे झालेसुद्धा, पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. शेतीतील संशोधनासाठी त्यांना शंभराहून अधिक पुरस्कार मिळाले. पण फक्त पुरस्कारांनी पोट भरत नाही, हे वास्तव आम्ही आयुष्यभर जगलो. बाबाजींनी शेतीमध्ये एवढं मोठं योगदान दिलं, पण त्यांना नेहमीच सापत्न वागणूक मिळाली.  बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला वाणांची पेटंट मिळालेली नाहीत की त्याची रॉयल्टी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या आजारपणातही हाताशी पैसे नव्हते. कुणाकडूनही आम्हाला मदत मिळाली नाही. अखेर बाबाजी आम्हाला सोडून निघून गेले. आमचा आधार गेला. पांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती.  पांढरा शर्ट आणि धोतर, डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा अशी दादाजींची साधी राहणी होती. बाहेरच्या जगासाठी ते दादाजी होते पण आम्ही घरात सर्वजण त्यांना बाबाजी म्हणूनच हाक मारायचो.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात आमचं घर आहे.  सकाळी पाच वाजता उठायचं. चहा रिचवायचा आणि खांद्यावर कापडी पिशवी अडकवून, हातात काठी घेऊन शेतावर जायचं. कित्येक वर्षं त्यांचा हा दिनक्रम होता. कितीही थंडी, ऊन, पाऊस असो, बाबा शेतावर जात असत. लोकं म्हणायची, हा सतत शेताकडे का जात असतो?  पहाटे लवकर उठून बाबाजी शेतावर जायचे. दहा-अकरा वाजता परत येताना गावातील चहाच्या टपरीवर चहा घेत, लोकांशी गप्पा मारत, पेपर वाचत आणि मग घरी येत असत.
नेहमीचं काम कौशल्यानं, बुद्धीनं काम करणाऱ्या बाबाजींना तेव्हा गावातली माणसं 'डोकेवाले' म्हणायचे. नंतर 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांनी त्यांना 'डोकेवाले' बोलणं बंद केलं. 'ग्रामीण संशोधक' म्हणून ते नावारूपाला आले.
ही गोष्ट 1983 सालची. तेव्हा बाबाजी शेतात 'पटेल 3' या धानाची लागवड करत. एका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली. त्याची पूर्ण भरणी व्हायची होती. बाबाजींनी बाकीचं धान काढलं आणि या लोंबीवर बारीक लक्ष ठेवलं. एका दिवशी बाबाजींना शेतात पिवळ्या रंगाची वेगळी लोंबी दिसली. पाखरं, गुरांनी खाऊ नये म्हणून बाजूने काठ्या वगैरे लावून धानाला संरक्षण दिलं. एक शेर धान त्यातून मिळालं. त्याची पुन्हा लागवड केली. मग एक पायली धान झालं. बाबाजी दरवर्षी हे नवीन धान लावत होते आणि उत्पादन वाढत होतं.

आपल्या वाणाला घड्याळाचं नाव कसं पडलं?
1989 साली त्यांनी माझ्या मामांना भीमराव शिंदेंना हे धान त्यांच्या शेतात लावण्यासाठी दिलं. तेव्हा 4 एकराला 90 पोते धान मिळालं. मामांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत हे नवीन धान विकायला नेलं. पण धानाला नावच नव्हतं.
आपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती. ज्या व्यापाऱ्याने ते धान विकत घेतलं त्याने मनगटावरच्या 'एच.एम.टी.' (हिंदुस्तान मशिन टूल्स) घड्याळाचं नाव त्याला दिलं. आपल्या वाणाला 'एच.एम.टी.' हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती. नंतर सगळीकडे त्या धानाचा बोलबाला होऊ लागला, तेव्हा बाबाजींना कळलं. त्यानंतर 1994 साली एके दिवशी या वाणाचं संशोधन कुणी केलंय याचा शोध घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मोघे आणि चंद्रपूरच्या भात संशोधन केंद्राचे ना. न. देशमुख बाबांना शोधत गावात आले. तेव्हा आम्ही एका साध्या झोपडीत राहत होतो. डॉ. मोघेंनी बाबाजींकडून सर्व माहिती घेतली. तुमच्या धानाला सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम मी करीन, असं बाबाजींना आश्वासनही दिलं.  बाबाजींनी अनेक वाण शोधून काढले. पण दुर्दैवाने त्याच वर्षी डॉ. मोघेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे त्याचं योग्य क्रेडिट आणि मोबदला बाबाजींना मिळालाच नाही.
पण बाबाजींना त्याबद्दल कसलंच दु:ख नव्हतं. त्यांचे प्रयोग सुरूच होते. 'नांदेड हीरा' (1994), 'विजय नांदेड' (1996), 'दीपक रत्न' (1997), 'डीआरके' (1998) म्हणजेच 'दादाजी रामजी खोब्रागडे' (हा 'जय श्रीराम' या नावानेही ओळखला जातो), 'काटे एच.एम.टी.' (2002), 'डीआरके सुगंधी' (2003), 'नांदेड चेन्नूर' आणि 'नांदेड 92' हे वाण बाबाजींनी शोधून काढले. नवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे. सुरुवातीला वाणांना काय नावं द्यायची याचं ज्ञान नव्हतं. नंतर त्यांनी नवीन वाणांना 'विजय', 'दीपक' या आपल्या नातवांची आणि गावाची नावं दिली. नवीन धान काढलं की बाबाजी ते गावातल्या लोकांना वाटून टाकायचे.
लहानपणापासून मी बाबाजींसोबत शेतात जायचो. शेतातली सर्व कामं करायचो. बाबाजी आणि मी खूप गप्पा मारायचो. ते मला वाण कसा ओळखायचा, त्याचे निकष काय हे समजून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे मी 'डीआरके 2' हे वाण शोधून काढलं. 1996-97च्या आसपास माझी प्रकृती अचानक बिघडली. मला चालताच येत नव्हतं. बाबाजींनी उपचारासाठी अनेक ठिकाणी नेलं पण गुण येईना. वर्षभराच्या उपचारानंतर शेवटी आयुर्वेदिक औषधानं बरा झालो.
पण या काळात भरपूर पैसा खर्च झाला. जमीन गहाण ठेवावी लागली आणि नंतर तीसुद्धा हातातून गेली. बाबाजींनी त्याचं कधीच दु:ख केलं नाही. मला मुलगा महत्त्वाचा आहे, असं बाबाजी म्हणायचे. त्यानंतर माझे सासरे श्रीरामजी वाघमारे यांनी बाबाजींना दीड एकर जमीन घेऊन दिली, त्यावर आम्ही पुन्हा शेती करू लागलो. शेती थोडी स्थिरस्थावर झाली पण 2004 साली आमची आई - राईबाई आम्हाला सोडून गेली.
अर्धांगिनी गेली त्याच्या दुसऱ्याच वर्षी बाबाजींना 2005 साली 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाला आणि बाबाजींचं नाव देशपातळीवर झालं. प्रत्येक सुख-दु:खात आपली साथ देणारी पत्नी यावेळेस आपल्यासोबत नाही याचं बाबाजींना प्रचंड दु:ख झालं.
बाबाजी तिसरीपर्यंत शिकले होते आणि मी सातवीपर्यंत. त्यामुळे सुरुवातीला पेटंट, रॉयल्टी याबाबत काहीच माहिती नव्हती. पण 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर हळूहळू एकएक गोष्टी कळत गेल्या.  मग वाणाचं वर्णन, उत्पादन, कुणाला कोणतं धान दिलं, लोकांचे संपर्क क्रमांक अशा सर्व गोष्टींची मी डायरीत नोंद करून ठेवायला लागलो.
2010च्या डिसेंबर महिन्यात एक दिवस मी आणि बाबाजी शेतात काम करत होतो. तेव्हा मीडियावाले आम्हाला शोधत शेतावर आले. पाच राज्यात मिळून एकूण एक लाख एकरवर 'एच.एम.टी.'ची लागवड एव्हाना होत होती.
या वाणाचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होत होता. शिवाय इतर वाणांनाही हळूहळू प्रसिद्धी मिळत होती. याची दखल 'फोर्ब्स' या मासिकाने घेतली होती.
आम्ही तर कधी 'फोर्ब्स' हे नावसुद्धा ऐकलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण "तुमचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलं गेलंय", असं सांगत मीडियावाले भरपूर मुलाखती घेऊन गेले. त्याची बातमी नंतर आम्हाला कुणीतरी इंटरनेटवर दाखवली, एवढंच.
एव्हाना बाबाजींना विविध राज्यांमधून बोलावणं येत होतं. तेव्हा मीसुद्धा बाबाजींसोबत दिल्ली, मुंबई, केरळ असा प्रवास केला. 2006साली महाराष्ट्र शासनातर्फे बाबाजींना कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पण आर्थिक विवंचनेमुळे तेच सुवर्णपदक विकण्याची वेळ आमच्यावर आली. नागपूरला सराफाकडे हे पदक घेऊन गेल्यानंतर ते पितळ्याचं असल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून सरकारवर बरीच टीका-टिपण्णी झाल्यानंतर राज्य सरकारने ते पदक बदलून दिलं. आजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले पण देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठानं बाबाजींच्या संशोधनाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याची खंत वाटते.
आपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून माझ्या मुलाला आणि नातवांना 20 एकर शेतजमीन, 20 लाख रूपये अनुदान आणि राहण्यासाठी घर मिळावं, असं पत्र त्यांनी 2015 साली लोकप्रतिनिधींना लिहिलं होतं. पण आम्हाला त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मे महिन्यात बाबाजींची प्रकृती जेव्हा अधिक खालावली तेव्हा डॉक्टरांनी, "तुम्ही आता फार आशा ठेवू नका", असं सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. आपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. बाबाजींना व्हेंटिलेटरवर ठेवावं असं वाटत होतं. पण त्याने फार उपयोग होणार नव्हता. अखेर बाबाजी गेलेच. 'कृषिप्रधान' म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशात एका शेती संशोधकाची अज्ञातवासात अखेर झाली. यापेक्षा खेदजनक काय असू शकतं? आता कुणी मदत करो अथवा न करो पण ज्या शेतात बाबाजींनी संशोधन केलं, तिथे आम्ही त्यांची समाधी बांधणार आहोत. शेती संशोधनाचं कार्य असंच पुढे सुरू ठेवणार आहोत. तीच बाबाजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
-  9 जून 2018