♥ #Updates : ⏩ जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.⏩ १३ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार.⏩.⏩

‘एचएमटी’वाले दादाजी

    देवनाथ गंडाटे    


दादाजी खोब्रागडे म्हणजे एका माणसाचं कृषी विद्यापीठच. जिज्ञासा आणि संशोधनासाठी वय अथवा शिक्षणाचा काहीच संबंध नसतो, हे दादाजींनी दाखवून दिले. तिसरा वर्ग शिकलेल्या दादाजींनी पूर्व विदर्भातील धान पिकाला लोकप्रियता मिळवून दिली, ती त्यांच्या एचएमटी वाणाने. वय झाले तरी आजही त्यांचे प्रयोग थांबलेले नाहीत. त्यांनी वेगवेगळे प्रयोग आणि संशोधन करून धानाचे ९ वाण विकसित केले. संपूर्ण आयुष्य शेती आणि भाताच्या वाण संशोधनात घालावल्यानंतरही ते थकले नव्हते़ आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतीशी एकनिष्ठ राहिले़ पुढल्या महिन्यात ते वयाची ऐन्शी गाठणार होते़ मात्र, शरीर थकले़ त्यांना पक्षघात झाला आणि महिनाभरापासून ते वैद्यकीय उपचार घेत असताना रविवार, दि़ ३ जून रोजी त्यांचे देहावसान झाले़ अंगावर सफेद सदरा अन् धोतर. कधी निळ्या रंगाचा कोट आणि टोपी. डोळ्यावर जाळ भिंगाचा चष्मा घातलेला हा शेतीतला माणूस अखेर जगाचा निरोप घेऊन गेला़
दादाजी खोब्रागडे यांचा जन्म वरोरा तालुक्यातील खुटाळा (ता. चिमूर) येथे १० जुलै १०३९ रोजी झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. तिसºया वर्गापर्यंत गावातच शिक्षण घेतले. अधूनमधून वडिलांसोबत शेतात हातभार लावत असायचे़ तरुण असतानाच दुष्काळ पडला. शेतात नापिकी झाली. कर्जाचा डोंगर झाला. शेती बुडाली. त्यामुळे या गावात राहून पोट भरण्याइतपत रोजगार नव्हता. अर्धपोटी राहून कसेबसे दिवस काढले. खुटाळा गाव सोडून नांदेड (ता. नागभीड) ला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. या गावात वडिलांचे आयुष्य गेले होते. त्यामुळे गावाला अखेरचा दंडवत करताना डोळे पाणावले होते. पण, नाइलाज होता. तळोधी गावापासून पश्चिमेस सात-आठ किलोमीटर अंतरावर नांदेड गावात स्थायिक झालेत. तिथं छोटीशी झोपडी बांधली. मजुरी करून पोट भरत असतानाच येथेच शेती घेतली. या पट्ट्यात केवळ भातपीक व्हायचे. बांधावरून पिकाची पाहणी करीत असताना धानांमध्ये एक बारीक लोंब दिसले. ते बघून ते आश्चर्यचकीतच झालो होतो. इतकी वर्षे भाताची शेती केली. पण, हे लोंब थोडे वेगळेच होते. ते मी तोडले. घरी आणले. त्यातूनच जिज्ञासा वाढली. आणखी असेच काही लोंब शोधत होते. धान आता निसवण्याचा स्थितीत होता. अंदाजे २०० ग्राम बारीक वाण एकत्रित केले. त्यांना सहा-सात महिने जपून ठेवले. उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच खरिपाची तयारी केली. धानाची पेरणी केल्यानंतर बांधाच्या एका कोपºयात संग्रहित झालेले बारीक वाणाचे बीजरोपण केले. साधारणत: १४० दिवसांनी पायलीभर उत्पादन झाले. त्यातून आणखी बारीक लोंब वेगळे काढले. दुसºयाही वर्षी तोच प्रयोग केला. दिसायला सुंदर, खाण्यास चवदार आणि कमी जागेत जास्त उत्पादन देणारे धान असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला. पण, हा प्रयोग करताना शेजारच्यांनी वेड्यातच काढले होते. 
कामधंदे सोडून काहीतरी फाजील उद्योग करतो, असे टोमणे मारत होते. तो शाब्दिक मार सहन केला. पण, आपल्या कामाच्या दिनचर्येत कधीही खंड पडू दिला नाही. गावातील भीमराव शिंदे यांनीही या वाणाची पेरणी केली. त्यांना पहिल्याचवर्षी ९० क्विंटलचे उत्पादन मिळाले. हा यशस्वी प्रयोग बघून अन्य शेतकºयांनाही मोह झाला. त्यांनीही या धानाची लागवड केली. पहिल्या हंगामात निघालेले हे अनामिक धान तळोधीच्या बाजारपेठेत गेले. पण, या धानाची कोणत्या नावाने खरेदी करायची, हा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीला पडला. तेव्हा एका शेतकºयाच्या हाताच्या मनगटाला घड्याळ दिसली. ती एचएमटी कंपनीची होती. घड्याळाची विश्वासार्हता बघून तेच नाव या धानाला देण्यात आले. एका गावातून दुसºया गावात, तालुक्यातून शहरात गेलेल्या या एचएमटीला मोठी पसंती मिळत गेली. संपूर्ण चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतकºयांनी एचएमटीचे पीक घेतले. जो शेतकरी या धानाची लागवड करेल तो प्रगत, असा विश्वास निर्माण झाला. पाच राज्यात सुमारे एक लाख हेक्टरवर एचएमटीची लागवड होते. एचएमटी आज तोंडपाठ झालीय. १९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. गेल्या ३५ वर्षांमध्ये केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून धानाचे नऊ वाण संशोधित केले आहेत. विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि सुगंधी अशी त्यांची नावे आहे. वय वाढले आणि शरीर थकले. शिवाय डोळ्याला नीट दिसत नाही. मुलगा मित्रजितच्या मदतीने हे संशोधन आजही सुरू होते़..