♥ #Updates : ⏩ जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.⏩ १३ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार.⏩.⏩

दादाजी खोब्रागडे : कृतघ्नतेचा बळी ...

     गजानन जानभोर  

आता दादाजी निघून गेल्यानंतर आपण उसासे टाकत आहोत. पण आपल्या डोळ्यादेखत हा निष्कांचन कृषी संशोधक अक्षरश: वेदनेने कण्हत निघून गेला, त्या अपराधाची आपल्याला लाज का वाटत नाही? दादाजींना श्रीमंत व्हायचे नव्हते, बंगले, माड्या बांधायच्या नव्हत्या. आपल्या क्रांतिकारी संशोधनाने येणारी भौतिक प्रतिष्ठाही त्यांना नको होती. त्यांना अखेरपर्यंत शेतकरीच राहायचे होते. कष्टकऱ्याने पोटभर खावे आणि जगाचीही भूक भागवावी, त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे हेच सार होते. दादाजी दारिद्र्यात जन्मले आणि दारिद्र्यातच मरण पावले. बळीराजाच्या वर्तमानाचे त्या अर्थाने ते प्रतिनिधी. त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा कष्टकऱ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंबहुना आपणच त्या पोहोचू दिल्या नाहीत. दादाजी हे आपल्या अनास्थेचे, कृतघ्नतेचे बळी आहेत........

स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेले दादाजी खोब्रागडे अखेर गेले. या जगाचा निरोप घेताना त्यांच्या शरीराला होत असलेल्या वेदना, त्यांच्या मनातील कालवाकालव आपण कुणीच समजून घेतली नाही. आपण जे करीत आहोत, त्यामुळे आपले दु:ख संपणार नाही, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत तशीच कायम राहील, हे ठावूक असूनही हा महान कृषी संशोधक आयुष्यभर गरिबांसाठी अक्षरश: खपला. त्यांच्या संशोधनाच्या बळावर कितीतरी जण श्रीमंत झाले. शेतकऱ्यांचे व्यापारी झाले, व्यापाऱ्यांचे सावकार झाले. दादाजी मात्र आहेत तिथेच आयुष्यभर राहिले. कदाचित त्यांना दुनियेची रित कळून चुकली असेल म्हणूनच की काय कुणाबद्दल त्यांच्या मनात राग नव्हता. शेवटपर्यंत केवळ शेतातच त्यांचा जीव तगमगायचा.
परवा ते गेल्यानंतर राज्यकर्ते, तथाकथित मान्यवर, साऱ्यांचाच कंठ दाटून आला. सांत्वनाचा महापूर आला. पण जगण्याशी संघर्ष करीत असताना यापैकी कुणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाहीत. दादाजी तसे अल्पशिक्षित, अल्पभूधारक. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड नावाचे एक खेडे आहे. अवघ्या दीड एकराच्या शेतात दादांनी धानावर संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या ‘एचएमटी’ या वाणाची सात राज्यांतील सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवड झाली. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेतले.
काही वर्षांपूर्वी दादांचा मुलगा आजारी पडला. या आजारपणात होती नव्हती ती शेती त्यांना विकावी लागली. कर्जाचे ओझे झाले. दादांच्या नातवाने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला होता. इथेही गरिबी आड आली. वर्षभरातच त्याने शिक्षण सोडले आणि मजुरीवर जाऊ लागला. दादांच्या सुनेला वडिलांनी दीड एकर शेती दिली. तीच या कुटुंबासाठी जगण्याचे एकमेव साधन बनले. शेताच्या याच तुकड्यावर त्यांनी तांदळाच्या जाती विकसित केल्या. दादांनी शोधलेल्या ‘एचएमटी’ या वाणाच्या जन्माची कथासुद्धा काहीशी रंजक. एका व्यापाऱ्याने दादांना विचारले, या बियाण्याचे नाव काय? ‘मायबाप मुलांना जन्म देतात, जन्मापूर्वीच त्याचे नाव ठेवतात का?’ दादांनी भाबडेपणाने उत्तर दिले. जवळच असलेल्या एका शेतकऱ्याच्या मनगटाला एचएमटी घड्याळ बांधलेले होते. दादांचे त्याकडे लक्ष गेले. ते सहज बोलून गेले. ‘तांदळाच्या या नवीन वाणाचे नाव ‘एचएमटी.’ दादांच्या एचएमटीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. शेतकरी भरघोस पीक घेऊ लागले. तांदळाच्या बाजारात क्रांती घडविणाऱ्या या वाणाची कीर्ती कृषी विद्यापीठापासून जगात सर्वत्र पसरली. दादांनी शोधलेले वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चोरले आणि स्वत:च्या नावावर खपवले. पण यामुळे दादा खचले नाहीत. नवनवीन वाण विकसित करण्याचे त्यांचे संशोधन सुरूच होते. नांदेड-९२, नांदेड-हिरा, विजय-नांदेड, दीपकरत्न, नांदेड-चिन्नोर, डीआरके. अशा कितीतरी वाणांचा दादांनी शोध लावला. त्यांचे ‘डीआरके’ हे वाण दादांच्याच नावावरून ठेवण्यात आले. त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनाची कदर सरकारने कधी केली नाही. नावापुरते एक दोन पुरस्कार दिले, त्यातील एक सुवर्णपदक नकली निघाले. त्यांच्या सन्मानाची अशी हेटाळणी सुरू होती. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या भारतातील शक्तीशाली ग्रामीण उद्योजकांच्या यादीत दादाजींना मानाचे स्थान मिळाले. पण त्यांच्या दारिद्र्याचे दशावतार संपले नाहीत. ‘फोर्ब्स’वाल्यांनी अभावग्रस्तांची यादी तयार केली असती तर कदाचित त्यातही दादाजी दिसले असते. कमालीचे दैन्य असूनही या माणसाने कधी तक्रार केली नाही, कुणाला शिव्या-शाप दिले नाहीत. आपल्या दु:खाचे भांडवल करून त्यांनी काही मिळवलेही नाही.
अलीकडच्या काळात सत्कार, मानसन्मानांचा त्यांना उबग आला होता. ‘सांत्वन परवडले, पण आता कौतुक नको’, असे ते म्हणायचे. ‘या सत्कारामुळे काय होते जी, सत्कार करणारे शाल पांघरून झोपवून देतात आणि नारळ खायला देतात. घरी सहा लोकं खाणारे, मग जगायचे कसे?’... दादाजींच्या गावात जाऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना एक लाख रुपये आणि पाच एकर शेती भेट म्हणून दिली. त्यानंतर पवारही दादाजींना विसरून गेले. देणगीत मिळालेल्या शेतीत संशोधनासाठी पैसे लागतात, दादाजींकडे ते नव्हतेच. पवार आपला प्रचारकी धर्म पाळून सोयीप्रमाणे विसरून गेले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, हॉलिवूडचा जगविख्यात दिग्दर्शक जेम्स हॅमरून, आताचे पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, शेतकऱ्यांचे कनवाळू जाणते राजे शरद पवार. या साऱ्यांच मान्यवरांनी दादाजींचे तोंडदेखले कौतुक केले. कृषिमंत्री म्हणून शरद पवारांनी ऊस, द्राक्ष उत्पादकांचा विशेष कळवळा जपला. साखर कारखानदारांचे हित जपण्यात त्यांचे आयुष्य निघून गेले. कृषिमंत्री या नात्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो एकर शेतजमीन त्यांनी पालथी घातली. पण दादाजींच्या शेतात येऊन त्यांचे संशोधन समजून घेण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण अस्वस्थ असल्याचे पवार नेहमीच सांगायचे. त्यामागची कारणे शोधण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे ते विदर्भात आल्यावर आवर्जून बोलायचे. दादाजींच्या शेतात जर गेले असते तर कदाचित पवारांच्या अस्वस्थतेचे निराकरणही झाले असते. पण पवार तिथे गेले नाहीत. इथे पवारांवर टीका करायची नाही. हा गरीब संशोधक भूकमुक्तीसाठी धडपडत असताना त्यावेळचे ‘निबर’ सरकार कसे वागत होते, त्याचा हा दुर्दैवी पुरावा आहे.
आजारपणात शेवटच्या काळात दादाजींना खूप वेदना व्हायच्या. उपचारासाठी पैसे नसल्याने नाईलाजास्तव त्यांना घरीच ठेवले होते. नंतर ब्रह्मपुरीला उपचार सुरू असताना राज्य सरकारने त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली. समाजातील काही सहृदय माणसेही धावून आली. शेवटचे काही दिवस दादाजी डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’मध्ये होते. पण तोवर वेळ निघून गेली होती.
आता दादाजी निघून गेल्यानंतर आपण उसासे टाकत आहोत. पण आपल्या डोळ्यादेखत हा निष्कांचन कृषी संशोधक अक्षरश: वेदनेने कण्हत निघून गेला, त्या अपराधाची आपल्याला लाज का वाटत नाही? दादाजींना श्रीमंत व्हायचे नव्हते, बंगले, माड्या बांधायच्या नव्हत्या. आपल्या क्रांतिकारी संशोधनाने येणारी भौतिक प्रतिष्ठाही त्यांना नको होती. त्यांना अखेरपर्यंत शेतकरीच राहायचे होते. कष्टकऱ्याने पोटभर खावे आणि जगाचीही भूक भागवावी, त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे हेच सार होते. दादाजी दारिद्र्यात जन्मले आणि दारिद्र्यातच मरण पावले. बळीराजाच्या वर्तमानाचे त्या अर्थाने ते प्रतिनिधी. त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा कष्टकऱ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंबहुना आपणच त्या पोहोचू दिल्या नाहीत. दादाजी हे आपल्या अनास्थेचे, कृतघ्नतेचे बळी आहेत. अशी नि:स्पृह, नि:संग माणसे अभावानेच जन्माला येतात. त्यांच्या समर्पणाचा भाव आपण समजू शकत नाही, कारण तसे निरलस मन आपल्याला लाभत नाही. दादाजी गेल्यानंतर आता व्यक्त होत असलेल्या संवेदना म्हणूनच मग वांझोट्या ठरतात...
गजानन जानभोर
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)
लोकमत, मंथन, दि. १० जून २०१८
gajananjanbhor@gmail.com

सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू...

     गजानन जानभोर   
स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या या संशोधकाच्या आयुष्याच्या संध्याकाळी आता साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. ‘फोर्ब्स’च्या वेळी त्यांच्या घरी हारतुरे घेऊन जाणारेही एव्हाना ओळख विसरले आहेत. दादांमुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन पालटले. त्यांचे संशोधन वापरून शेतकरी व व्यापारी श्रीमंत झाले. ‘मलाच श्रीमंत होता आले नाही, त्यात त्यांचा काय दोष?’ स्वत:च्या वंचनेची दादा अशी समजूत घालायचे. सर्वाधिक पीक देणाºया ‘एचएमटी’ या तांदळाच्या वाणाचे आपण जनक आहोत, या गोष्टीचा त्यांना ना अभिमान ना अहंकार
         दादाजी खोब्रागडे        

दादाजी खोब्रागडे अत्यवस्थ आहेत. त्यांना अर्धांगवायू झालेला, ते बोलू शकत नाहीत. जेवणही बंद. खंगलेला देह मृत्यूची वाट पाहत... कोण आहेत हे दादाजी? वर्तमानाला ठाऊक असते तर त्यांच्या हलाखीची अशी बातमी झाली नसती. दादाजींनी शोधलेल्या तांदळाच्या वाणांमुळे आपले साऱ्यांचे जगणे बदलले. तांदळाचे नऊ वाण त्यांनी विकसित केले. अगदी डॉ. कलामांपासून ते शरद पवारांपर्यंत साऱ्यांनीच त्यांचे कौतुक केले. पण मानसन्मानाने पोट भरत नाही. ‘फोर्ब्स’ने २०१० मध्ये एक यादी प्रसिद्ध केली. त्यात दादाजींच्या संशोधनाची दखल घेत ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले. पण आपल्या संशोधनाचा धंदा त्यांना करता आला नाही म्हणूनच त्यांच्या दारिद्र्याचे दशावतार कायम आहेत. ते गेल्यानंतरही कुटुंबाला घट्ट आवळून ठेवणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड हे खेडे. दादाजींचे दोन खोल्यांचे घर, दीड एकर शेती आणि खाणारे सहा जीव. स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या या संशोधकाच्या आयुष्याच्या संध्याकाळी आता साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. ‘फोर्ब्स’च्या वेळी त्यांच्या घरी हारतुरे घेऊन जाणारेही एव्हाना ओळख विसरले आहेत. दादांमुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन पालटले. त्यांचे संशोधन वापरून शेतकरी व व्यापारी श्रीमंत झाले. ‘मलाच श्रीमंत होता आले नाही, त्यात त्यांचा काय दोष?’ स्वत:च्या वंचनेची दादा अशी समजूत घालायचे. सर्वाधिक पीक देणाऱ्या ‘एचएमटी’ या तांदळाच्या वाणाचे आपण जनक आहोत, या गोष्टीचा त्यांना ना अभिमान ना अहंकार. ‘१९८१ ची गोष्ट, त्यावेळी पटेल-३ नावाचे वाण सगळीकडे प्रचलित होते. दादांनी शेतात हेच वाण लावले. धान अगदी भरात असताना त्यांना त्यात काही वेगळ्या ओंब्या दिसल्या. कुतूहल म्हणून त्यांनी ओंब्यांचे बियाणे अन्य धानाशी क्रॉस केले. क्रॉस केलेल्या या धानाचे दादांनी तीन-चार वर्षे पीक घेतले. या बियाण्यांचा वापर केला तर पीक लवकर येते, त्याचा दर्जाही चांगला असतो. ‘दादांच्या या चमत्काराची बातमी पंचक्रोशित पसरली आणि मग दरवर्षी शेकडो शेतकरी या बियाणांसाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कृषी क्षेत्रात क्रांती करणारे फार मोठे संशोधन आपण केल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. दादांच्या दृष्टीने तो एक साधा प्रयोग. दादांच्या वाणाची कीर्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठापर्यंत पोहोचली. विद्यापीठाचे दोन संशोधक दादांना भेटायला आले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आता आपले संशोधन विद्यापीठ स्वीकारेल, असे दादांना वाटत होते. पण घडले विपरीत. काही दिवसांनी कृषी विद्यापीठाने बदमाशी करीत हेच वाण ‘एचएमटी-पीकेव्ही’ नावाने बाजारात आणले. ‘तुमच्या संशोधनाला शास्त्रीय आधार नाही’, असे निर्लज्ज व ऐतखाऊ उत्तर विद्यापीठाने त्यांना दिले. पण दादा खचले नाहीत.
दादांचे संशोधन सुरूच होते. पुढच्या दहा वर्षात त्यांनी नांदेड-९२, नांदेड-हिरा, नांदेड-चिनोर, डीआरके अशा कितीतरी वाणांचा शोध लावला. त्यावेळच्या सरकारने त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. पण ते पदकही नंतर नकली निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांना वर्षभर दहा हजार रुपये दर महिन्याला मदत केली. पण पुढे काय? ‘एकवेळ सांत्वन परवडले, आता कौतुकही नको’, दादांची भेट झाल्यानंतर त्यांचा हा प्रश्न अंत:करणाला चिरे पाडायचा. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या उपचारासाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत दिली.पण समाज म्हणून आपण या संशोधकाचे काहीच देणे लागत नाही? मृत्यू जवळ आहे, पण सोबतीला कुणीच नाही. नंतर मात्र बेईमान सांत्वनांचा पूर येईल. कविवर्य श्रीकृष्ण राऊत यांची कविता अशावेळी अस्वस्थ करून जाते,

सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू...
तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे...

 गजानन जानभोर
लोकमत, दि. ३० मे २०१८
gajananjanbhor@gmail.com

उपेक्षित संशोधक दादाजी खोब्रागडे

    प्रफुल्ल फडके 

संशोधन हे फक्त विज्ञान क्षेत्रातच होते आणि रोजच्या जीवनाशी त्याचा काही संबंध नसतो असा विचार सामान्य माणूस करत असतो. विज्ञान आणि संशोधनापासून लांब पळतो किंवा त्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जाते. पण आपल्या नित्याच्या गरजेतूनही चांगले संशोधन होऊ शकते हे दाखवून दिले ते दादाजी खोब्रागडे यांनी.गरज ही शोधाची जननी आहे असे सहजपणे म्हटले जाते, पण हे वाक्य दादाजींनी खरे करून दाखवले. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे आपल्या देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. कृषी क्षेत्रातील दादाजी खोब्रागडे यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकून त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा शेतक-यांच्या समोर राहिला पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते.
                          दादाजीचे घर                   
दादाजींनी शोधलेल्या तांदळाच्या वाणांमुळे आपले सा-यांचे जगणे बदलले. तांदळाची चक्क नऊ वाणे त्यांनी विकसित केलेली आहेत. त्यांचे हे काम कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वाचे आहे. त्याची शासकीय पातळीवर म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही हे खेदाने का होईना कबूल करावे लागेल. कारण अखेरच्या काळात त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती, हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे या कल्पक संशोधक शेतक-याला आपण ख-या अर्थाने न्याय दिलेला नाही असेच म्हणावे लागेल. अगदी भारताचे राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांपासून ते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांपर्यंत सा-यांनीच त्यांचे कौतुक केले, पण नुसत्या कौतुकाने आणि मानसन्मानाने पोट भरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फोर्ब्स’ने २०१० मध्ये एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात दादाजींच्या संशोधनाची दखल घेत ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते, पण आपल्या संशोधनाचे मार्केटिंग त्यांना करता आले नाही. इथेच आमचा शेतकरी कमी पडला असे म्हणावे लागेल. एवढे संशोधन करूनही आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान देऊनही अखेरपर्यंत त्यांच्या दारिद्य्राचे दशावतार संपले नव्हते. हीच आपल्याला लांच्छनास्पद अशी गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या निधनांनंतर सरकारने त्यांच्या कुटुंबियांना भरघोस काहीतरी देऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड हे खेडे. दादाजींचे दोन खोल्यांचे घर, दीड एकर शेती आणि खाणारे सहा जीव असा प्रपंच. त्यामुळे प्रसंगी स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या या संशोधकाच्या आयुष्याच्या संध्याकाळी सर्वांचेच दुर्लक्ष झाले ही वैषम्याची बाबच म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर फोर्ब्सने दखल घेतल्यावर अनेकांनी त्यांचे कौतुक केले, हारतुरे घातले आणि त्यांची भेट घेतली. पण नंतर मात्र दादासाहेबांचा सर्वांना विसर पडला ही फार वाईट गोष्ट म्हणावी लागेल. खरे तर दादांमुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लाखो शेतक-यांचे जीवन पालटले आहे. त्यांचे संशोधन वापरून शेतकरी व व्यापारी श्रीमंत झाले. पण दादासाहेब मात्र जमिनीवरच राहिले. ही एकप्रकारची नियतीची विटंबनाच म्हणावी लागेल. दादासाहेबांनी तरीही आपले साधेपण आणि समाधान ढळू दिले नाही. 

आधुनिक काळातील संत तुकारामच म्हणावे लागेल त्यांना. आपली थैली भरणार का याचा विचार न करता इतरांना त्याचा लाभ मिळवून देणारे दादाजी तुकारामांप्रमाणेच अखेपर्यंत जैसे थे राहिले. आपल्या मनाची समजूत ते घालून घेत असत. आपल्या जिवावर बाकीचे मोठे झाले पण मलाच श्रीमंत होता आले नाही, त्यात त्यांचा काय दोष? असे म्हणून ते शांत रहात. सर्वाधिक पीक देणा-या एचएमटी या तांदळाच्या वाणाचे दादासाहेब खोब्रागडे हे संशोधक होते, जनक होते. या गोष्टीचा त्यांनी कधी अभिमान बाळगला नाही की कसला अहंकार केला नाही. १९८१ पर्यंत पटेल-३ नावाचे वाण सगळीकडे प्रचलित होते. दादांनी शेतात हेच वाण लावले. धान अगदी भरात असताना त्यांना त्यात काही वेगळ्या ओंब्या दिसल्या. कुतूहल म्हणून त्यांनी ओंब्यांची बियाणे अन्य धानाशी क्रॉस केली. क्रॉस केलेल्या या धानाचे दादांनी तीन-चार वर्षे पीक घेतले. या बियाण्यांचा वापर केला तर पीक लवकर येते, त्याचा दर्जाही चांगला असतो. दादांच्या या चमत्काराची बातमी पंचक्रोशित पसरली आणि मग दरवर्षी शेकडो शेतकरी या बियाणांसाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कृषी क्षेत्रात क्रांती करणारे फार मोठे संशोधन आपण केल्याचे त्यांच्या मनातही कधी नव्हते. दादांच्या दृष्टीने तो एक साधा प्रयोग होता. 

दादांच्या वाणाची कीर्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठापर्यंत पोहोचली. विद्यापीठाचे दोन संशोधक दादांना भेटायला आले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आता आपले संशोधन विद्यापीठ स्वीकारेल, असे दादांना वाटत होते. पण घडले विपरीत. काही दिवसांनी कृषी विद्यापीठाने बदमाशी करीत हेच वाण एचएमटी-पीकेव्ही नावाने बाजारात आणले. विद्यापीठाने फसवले तरी दादा स्थिर राहिले. दादांचे संशोधन सुरूच होते. पुढच्या दहा वर्षात त्यांनी नांदेड-९२, नांदेड-हिरा, नांदेड-चिनोर, डीआरके अशा कितीतरी वाणांचा शोध लावला. त्यावेळच्या सरकारने त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. पण ते पदकही नंतर नकली निघाले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांना वर्षभर दहा हजार रुपये दर महिन्याला मदत केली. बाकी कोणीही त्यांची दखल घेतली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. दादांच्या अखेरच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या उपचारासाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत दिली. पण या कृषीक्षेत्राल मोठय़ा व्यक्तिला उपेक्षाच पदरी पडली. आज शेतक-यांना संजीवनी देणारे संशोधन करणारा पोशिंदा जन्माला जसा आला तसाच रिकाम्या हाताने गेला. पंतप्रधान मोदींनी दादासाहेबांच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, कारण सर्वात प्रथम त्यांनीच दादासाहेबांना मदत केली. हि-याची पारख जवाहिराला असते तसाच हा प्रकार होता. आता सरकारी पातळीवर त्यांच्या कुटुंबियांवर अनुकंपा करण्याची गरज आहे.

http://prafullaphadkemhantat.blogspot.com/2018/06/blog-post_5.html